नवी दिल्ली – राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी रविवारी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी काल अचानक राजीनामा दिल्याबद्दल ‘आश्चर्य’ व्यक्त केले आणि त्यामागील कारणावर प्रश्न उपस्थित केले. सिब्बल म्हणाले की लोकसभा निवडणुकीला केवळ काही दिवस बाकी असताना अचानक निवडणूक आयुक्ताने राजीनामा देण्यामागे काही तरी गंभीर कारण असले पाहिजे.
त्यांचा कार्यकाळ संपण्यास तब्बल दोन वर्षे बाकी असताना आणि त्यांना भविष्यात मुख्य निवडणूक आयुक्त पदाची संधी असताना त्यांनी अचानक राजीनामा देणे अगदीच आश्चर्यकारक आहे, असे ते म्हणाले.
सिब्बल यांनी आरोप केला की, निवडणूक आयोग केवळ स्वताच्या हितासाठीच वापरण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे निवडणुकीचे वेळापत्रक, निवडणुकीचे टप्पे, निवडणुकीचे सर्व पैलू सत्ताधारी पक्षाच्या हितासाठी तयार केले जातील, असे ते म्हणाले. विरोधी पक्षांना निवडणूक आयोगाकडून आता काही खास अपेक्षा उरलेल्या नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.
भाजपच्या लोकांनी केलेल्या आचारसंहितेचा भंग करणाऱ्या भाषणांवर कारवाई केली जात नाही आणि विरोधी सदस्याने आदर्श आचारसंहितेपासून थोडेसे जरी विचलन केले तर त्यांना तत्काळ नोटीस बजावली जाते, हे आपण यापूर्वी पाहिले आहे. त्यामुळे आम्हाला या आयोगाचे पूर्णपणे पक्षपाती स्वरूप माहीत आहे. त्यामुळे आयोगाकडून आम्हाला अपेक्षा नाहीत. निवडणूक आयोग ही सत्ताधारी पक्षाचीच बटिक यंत्रणा बनली आहे.
कार्यपालिका, विधिमंडळ आणि न्यायपालिका असे तीन स्तंभ असलेले संविधान हा लोकशाहीचा पाया आहे. निवडणूक मुक्त आणि निष्पक्षपणे पार पडावी, ही निवडणूक आयोगाची भूमिका आहे. मात्र, गेल्या १० वर्षांत, असे दिसते की निवडणूक आयोग हा सरकारचा विस्तारित हात बनला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.