पाथर्डी शहराचा वीजपुरवठा अठरा तास खंडित

पाथर्डी – पाथर्डीत रविवारी (दि.31) रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्‍यातील वीजपुरवठ्याचा अक्षरशा खेळखंडोबा झाला. जोराच्या वाऱ्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील विजेच्या तारा तुटल्याने रविवारी रात्री एक वाजल्यापासून ते सोमवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित होता. सोमवारी सायंकाळपर्यंत कासार पिंपळगाव सबस्टेशन अंतर्गत येणारा ग्रामीण भागातील काही गावांचा वीजपुरवठा सुरळीत झाला होता. मात्र शहराचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणच्या यंत्रणेला यश आले नव्हते.

रविवारी रात्री झालेल्या पहिल्याच पावसाने वीजपुरवठा खंडित झाला. सलग अठरा तास वीज नसल्याने पाथर्डीकर हैराण झाले होते. महावितरण कपंनीचे अधिकारी व कर्मचारी यांनी दिवसभर तुटलेल्या तारा जोडण्याचे काम केले. मोबाईल टॉवरची रेंजही दिवसभर जात-येत होती. त्यामुळे बहुतेक मोबाईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. रविवारी रात्री आठ वाजता पाथर्डी शहरासह तालुक्‍यात पावसाला सुरुवात झाली. 31 मे रोजी आलेला पाऊस शेतकऱ्यांना दिलासा देणारा होता. जमिनीतील उष्णता कमी करण्यासाठी पावसाची गरज होतीच. रात्री आठ वाजता सुरू झालेला पाऊस बराच वेळ सुरू होता. नंतर बुरबुर सुरूच होती. रात्री एक वाजता शहरातील वीजपुरवठा खंडित झाला.

उकाडा एवढा होता की माणसे घराबाहेर येऊन बसली होती. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. सोमवारी सकाळपासून महावितरण कंपनीचे शहर अभियंता मयूर जाधव व त्यांचे सहकारी दिवसभर विजेच्या तुटलेल्या तारा जोडण्याचे काम करीत होते. सायंकाळपर्यंत वीजपुरवठा बंदच होता. शहरातील विजेवर चालणारे सर्व व्यवसाय दिवसभर बंद होते. मोबाईल टॉवरचा वीजपुरवठा बंद असल्याने रेंजही गायब होत होती. शहरात दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.