एनडीआरएफतर्फे “विशेष नियमावली’

पुणे – राज्यात आधीच करोनाचा धोका असताना अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागांमध्ये आपत्ती उद्‌भविण्याची शक्‍यता आहे. या दोन्ही पातळीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलातर्फे (एनडीआरएफ) “विशेष नियमावली’ तयार केली असून आता दलातर्फे “कोविड विशेष नौका’ आणि जवानांना पीपीई कीटची सुविधा करण्यात आली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या “निसर्ग’ या चक्रीवादळामुळे राज्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शासनातर्फे मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या नऊ तुकड्या तैनात केल्या आहेत. मात्र, सध्या उद्‌भवलेल्या करोनाच्या पार्श्‍वभूूमीवर दलाच्या जवान आणि इतर नागरिकांना संसर्गाचा धोका लक्षात घेत, एनडीआरएफतर्फे आपत्ती निवारण प्रक्रियेच्या नियमावलीत काही सुधारणा केली आहे.

याबाबत दलाचे एस. गावडे म्हणाले, “सुधारित नियमावलीनुसार आपत्ती व्यवस्थापन कार्यात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. विशेषत: सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यावर अधिक भर दिला आहे. तसेच, गावांमध्ये असणारे क्‍वारंटाइन केंद्र, रुग्नालये या ठिकाणाहून नागरिकांना बचाव करण्यासाठी विशेष तयारी केली आहे. यामुळे दलाचे जवान आणि इतर नागरिक यांना विषाणू संसर्गाचा धोका टाळता येऊ शकेन. महत्त्वाचे म्हणजे यावेळी जवानांना त्यांचा नेहमीचा गणवेश (डांगरी) न घालता पीपीई कीट घालावी लागणार आहे. यामुळे हे आपत्ती व्यवस्थापन कार्य नक्‍कीच आव्हानात्मक असेल.’

एनडीआरएफची सुधारित नियमावली
– बचाव कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नौकेत आठ ऐवजी चारच नागरिक असतील.
– करोनाबाधित व्यक्‍तीसाठी वेगळी नौका असेल.
– बाधित व्यक्‍तीसाठीची नौका आवश्‍यक सुविधांनी सज्ज.
– क्‍वारंटाइन सेंटर असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिका, डॉक्‍टर यांची सुविधा असणार.
– दलाच्या तळामध्ये फेसशिल्ड, मास्क, सॅनिटायझर यांची व्यवस्थाही केली जाणार.

Leave A Reply

Your email address will not be published.