प्रियकरानेच केले तरुणीचे अश्‍लील फोटो व्हायरल

प्रियकरावर गुन्हा : भांडण झाल्यानंतर मोबाइल घेऊन गेला 

पिंपरी  – भांडण झालेल्या प्रेयसीचा फोन घेऊन सोशल मीडियावरून तिचे अश्‍लील फोटो नातेवाईकांना पाठविले. तसेच इतर ठिकाणीही सोशल मीडियावर पाठवून तिची बदनामी केली. ही घटना सांगवी येथे घडली. याप्रकरणी प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
स्वप्निल सुरेश सांबरे (रा. कुंभार चाळ, देहुरोड रेल्वे स्टेशनजवळ, देहुरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्निल आणि फिर्यादी तरुणी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. नोव्हेंबर 2018 ते 9 सप्टेंबर 2019 या कालावधीत स्वप्निल याने फिर्यादी तरुणीचा पाठलाग करून पैशांच्या आणि इतर कारणावरून तिला मारहाण केली. तिचे अश्‍लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने तरुणीला दिली.

आरोपी तरुणीचा मोबाइल घेऊन गेला आणि त्यातील ई-मेल, फेसबुक, व्हाट्‌सअप, इंस्टाग्राम अकाउंट व मोबाईल स्क्रीनचे पासवर्ड बदलले. त्यानंतर तिच्या फोनमध्ये सेव्ह असलेल्या तिच्या नातेवाईकांचा व्हॉट्‌स ऍपवर “फॅमिली’ नावाचा ग्रुप बनविला. या ग्रुपवर त्याने तिच्याच मोबाइलने तिचे अश्‍लील फोटो पोस्ट केले. तसेच तिच्या फोनद्वारेच सोशल मीडियावर तिची बदनामी केली. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गवळी याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.