…तर 6 तास काम करा : विनाकारण फिरणाऱ्यांना अस्सल ‘पुणेरी’ शैलीत टोला
पुणे – “मला काही होत नाही!’, “घरी बसून कंटाळा आलाय, जरा चक्कर मारून येतो’, “पोलीस काही करत नाही’, अशा अविर्भावात विनाकारण घराबाहेर पडणार असाल, तर सावधान. कारण, आता विनाकारण घराबाहेर फिरण्यासाठी केवळ आर्थिक दंड होणार नाही, तर सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण असलेल्या परिसरात पोलिसांबरोबर सहा तासांची ड्युटीपण करावी लागणार आहे.
पुणे पोलिसांचे ट्विटर खाते नेहमीच चर्चेत असते. पुणे पोलीस नेहमीच मार्मिक शैलीत ट्विट करत जनजागृती करतात. तर कधी अस्सल “पुणेरी’ शैलीत टोलादेखील लगावतात. शनिवारी असेच पोलिसांचे एक ट्विट विशेष चर्चेत आहे. ट्विटरवर पोलिसांनी केलेल्या ट्वीटमध्ये नागरिकांना एक आव्हान दिले आहे. शहरात संचारबंदी लागू असतानाही अनेक नागरिक सर्रास नियमांचे उल्लंघन करत आहेत. बेशिस्त नागरिकांच्या संख्येला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी ट्विटरवर एक अट घालत, “बाहेर जायचे त्यांनी खुशाल जा’ असे म्हटले आहे. पण या ट्वीटमध्ये पोलिसांनी पोलिसांबरोबर काम करण्याच्या संधीसह “बोला मंजूर?’ असे विचारले आहे. या ट्विटला नेटीझन्सकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. याला 3 हजारपेक्षा अधिक जणांनी “लाइक’ही केले आहे.
शहरात महिनाभरापासून संचारबंदी लागू आहे. या कालावधीत वाहन वापरण्यास आणि वाहतुकीस निर्बंध घालण्यात आले आहेत. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आणि पोलिसांची परवानगी असणाऱ्या नागरिकांना प्रवास करता येत आहे. मात्र, या निर्बंधांकडे दुर्लक्ष करत अनेक नागरिक विनाकारण आणि क्षुल्लक कारणांसाठी रस्त्यावर वावरत आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांनी घरात बसावे यासाठी सुरूवातीला पोलिसांनी एक ना अनेक प्रकारे प्रबोधन आणि जनजागृती केली. त्यानंतर पोलिसांनी काठीचा बडगा उगारला, व्यायाम करवून घेतले. सध्या पोलिसांकडून बेशिस्त नागरिकांची वाहने जप्त करून, दंड देखील आकारण्यात येत आहे. मात्र तरीही नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळेच आता अधिक कठोर नियम राबविण्याबाबत विचार केला जात आहे.
काय म्हटलंय ट्विटमध्ये?
ज्यांच्याकडे कोणताही पास नाही किंवा कोणतीही गरज नसताना बाहेर जायचंय, त्यांनी खुशाल जा ! पण आमची एक अट आहे. आधी 6 तास करोना संसर्ग झालेल्या रेड झोनमध्ये पोलिसांसोबत ड्युटी करून दाखवावी. बोला मंजूर?’ असे ट्विट पुणे पोलिसांनी केले आहे.
ज्यांच्याकडे कोणताही पास नाही किंवा कोणतीही गरज नसताना
बाहेर जायचंय, त्यांनी खुशाल जा!पण आमची एक अट आहे.
आधी 6 तास कोरोना संसर्ग झालेल्या “रेड झोन” मध्ये पोलीसांसोबत ड्युटी करून दाखवावी.
बोला मंजूर ?@CPPuneCity @PuneCityTraffic #StayHomeStaySafe— PUNE POLICE (@PuneCityPolice) April 24, 2020