रायबरेली – कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी रायबरेलीच्या जनतेला भावनिक आवाहन केले. मी माझा मुलगा (राहुल गांधी) तुमच्याकडे सोपवतेयं. तो तुम्हाला निराश करणार नाही, असे त्या म्हणाल्या.
उत्तरप्रदेशच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत सोनिया सहभागी झाल्या. त्यांच्या भाषणावेळी पुत्र राहुल आणि कन्या प्रियंका गांधी हे दोघेही व्यासपीठावर त्यांच्या बाजूलाच उभे होते. स्वत: सोनियांनी याआधी २० वर्षे खासदार म्हणून रायबरेलीचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले.
मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सोनियांनी रायबरेलीकरांचे आभार मानले. रायबरेलीच्या जनतेने दिलेली संधी माझ्या जीवनातील सर्वांत मोठी संपत्ती आहे. मला सर्व काही तुमच्याकडूनच मिळाले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि रायबरेलीच्या जनतेकडून मला खूप काही शिकायला मिळाले. तीच शिकवण मी राहुल आणि प्रियंका यांना दिली आहे.
सर्वांचा आदर करा. दुर्बलांचे रक्षण करा. जनतेच्या हक्कांसाठी अन्यायाविरोधात लढा. घाबरू नका. कारण, संघर्षाची आणि परंपरांची तुमची मुळं अतिशय खोलवर रूजली आहेत, असे त्या राहुल आणि प्रियंका यांना उद्देशून म्हणाल्या.
रायबरेली हा कॉंग्रेसचा आणि विशेषत: गांधी परिवाराचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. गांधी परिवाराचा आणखी एक बालेकिल्ला मानल्या गेलेल्या अमेठीऐवजी रायबरेलीमधून लढण्याचा निर्णय यावेळी राहुल यांनी घेतला आहे.