मुंबई – घाटकोपर दुर्घटनेच्या दिवशी वाऱ्याचा वेग ताशी 96 किलोमीटर इतका प्रचंड होता, नॉर्मली वाऱ्याचा वेग हा ताशी 50 ते 60 किलोमीटर इतका असतो. त्यामुळे, वाऱ्याचा वेग इतका अधिक असल्यास अधिकारीही हे मान्य करतात की अशावेळी नैसर्गिक दुर्घटना किंवा अशा घटना घडू शकतात.
याचदरम्यान, वडाळा येथेही लोखंडी पार्किंगचा सांगाडा कोसळल्याची घटना घडली. मात्र, पोलिसांनी तिथ कलम 304 लावले नाही. फक्त याच गुन्ह्यात कलम 304 लावलं, कारण इथे मोठी जीवितहानी झालेली आहे, असा वादळी युक्तिवाद घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेचे वकील रिझवान मर्चंट यांनी न्यायालयात केला आहे. दरम्यान, भावेश भिंडेला २५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.
मुंबईत काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. मात्र, याच दिवशी घाटकोपर दुर्घटनेतून मोठी मनुष्यहानी झाली. येथील बॅनर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 1६ जणांचा जीव गेला असून अनेकजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक केली आहे. त्यानंतर, भावेशला आज न्यायालयात हजर करण्यात आले.
या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं, त्यावेळी होर्डिंगचं स्ट्रक्चर हे उत्तम दर्जाचं असल्याचा अहवाल 2023 मधील आहे. अहवालात होर्डिंगची उंची लांबी रुंदी आणि इतर गोष्टी स्पष्टपणे दिलेल्या आहेत,असा युक्तिवाद आरोपीचे वकिल रिजवान मर्चंट यांनी न्यायालयात केला आहे. तसेच, या गुन्ह्यात 304 हे कलम लागू शकत नाही. तर, आरोपीला अटक करताना नियमांचे पालन झाले नसल्याचा युक्तिवादही रिजवान मर्चंट यांनी केला.