शिक्रापूर : प्लॉटिंग व्यावसायिकास रिव्होल्व्हरच्या धाकाने दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे .
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील काही युवकांनी काही जमीन प्लॉटिंग साठी विकत घेतली आणि त्यातून प्लॉटिंग व्यवसाय सुरु केला. परंतु सदर जमिनीमध्ये जमिनीच्या मूळ वारसदारांनी आक्षेप घेतल्याने त्याचा दावा न्याय प्रविष्ट असताना जमिनीमध्ये पैसे गुंतविले असताना देखील एकाने प्लॉटिंग व्यावसायिकाकडे दीड कोटी रुपयांची खंडणी मागत आता व्यावसायिकास रिव्होल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर (ता. शिरूर) येथे प्लॉटिंग करणारे सुधीर धुमाळ यांनी त्यांच्या काही मित्रांसमवेत जमीन विकत घेत प्लॉटिंग केले. परंतु, घेतलेल्या जमिनीचे मूळ मालकाच्या वारसदारांनी आक्षेप घेतल्याने त्या जमिनीचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र या जमिनीमध्ये पैसे न गुंतविता ज्याचे ओळखीने जमीन घेतली ते पिंटू दरेकर हे वारंवार धुमाळ यांच्याकडे दीड कोटी रुपयांची मागणी करू लागले.
यावेळी धुमाळ यांनी जमिनीचा निकाल लागल्यानंतर जमीन विक्रीतून येणाऱ्या पैशातून पैसे देईल असे सांगत होते, तर २५ जुलै रोजी धुमाळ हे त्याच्या सोसायटीमध्ये बसलेले असताना त्यांना विशाल ढोले या युवकाचा फोन आला. त्याने धुमाळ यांना सागर वर्पे यास तुमच्याशी बोलायचे आहे बाहेर रोडवर या असे सांगितले. त्यांनतर धुमाळ हे बाहेर आले असता सागर व विशाल हे बिगर नंबरच्या वेरणा कार मधून तेथे आले. त्यांनी धुमाळ यांना गाडीत बसल्यास सांगितले, धुमाळ गाडीत बसल्यानंतर सागर वर्पे याने धुमाळ यांना आम्हाला पिंटूशेठ यांनी पाठविले असून पिंटूशेठ पार्टनर असलेल्या व तुम्ही प्लॉटिंगसाठी घेतलेल्या दोन्ही जमिनींचे मिळून दीड कोटी रुपये तू सहा महिन्यांमध्ये देण्यास तयार हो नाहीतर तुला फार महागात पडेल असे म्हणून सागर व विशाल यांनी धुमाळ यांना दमदाटी करण्यास सुरवात केली.
यावेळी सागर याने कमरेचे रिव्होल्व्हर काढून धुमाळ यांच्या पोटाला लावून तू जर पिंटूशेठयांच्या सांगण्याप्रमाणे पैसे दिले नाही तर तुला आणि तुझ्या घरच्यांना पाहून घेत गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. त्यांनतर धुमाळ यांनी घडलेला प्रकार त्यांच्या भावांना व इतरांना सांगून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आले असताना रात्रीच्या वेळी राखाडी रंगाच्या ऑडी कारमधून सागर वर्पे व पिंटू दरेकर हे आले व त्यांनी त्यांची गाडी पोलीस स्टेशनच्या बाहेर उभी करून गेटच्या आतमध्ये येऊन धुमाळ यांना आमच्य विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर गोळ्या घालू अशी धमकी देत शिवीगाळ, दमदाटी केली आणि गाडीमध्ये बसून निघून गेले.
याबाबत सुधीर संभाजी धुमाळ (रा. विशाल विश्व सोसायटी तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. पिंपळे खालसा ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी संतोष उर्फ पिंटू रभाजी दरेकर (रा. सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे), सागर वर्पे (रा. करंदी ता. शिरूर जि पुणे), विशाल ढोले (रा. विश्व सोसायटी तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. जुन्नर ता. जुन्नर जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर व पोलीस नाईक तेजस रासकर हे करत आहे.