भरउन्हात पाण्याची वानवा : शौचालयाची दुरवस्था : प्रवाशांचे हाल
शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अनेक दिवसांपासून बंद असलेले भले मोठे एसटी स्थानक सध्या स्थानिक नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर सुरु झाले आहे. सध्या ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना पिण्यासाठी पाणी नाही. तसेच शौचालयाची सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. एसटी स्थानक असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शिक्रापूर येथील एसटी स्थानक अनेक दिवसांपासून बंद स्थितीत असल्याने पुणे- नगर महामार्गावरून येणारी जाणारी सर्व वाहने रस्त्याने एसटी स्थानकात न जाता रस्त्याने सरळ निघून जात होते. काही महिन्यांपूर्वी शिक्रापूर गावातील समस्या उपाय ग्रुपच्या युवकांनी पुढाकार घेत एसटी स्थानक स्वच्छता करुन घेत पाठपुरावा करुन सर्व वाहने एस टी स्थानकात येण्याचे प्रयत्न केले. काही दिवसांपासून व्यवस्थापक नेमून या गाड्या एसटी स्थानकात आणण्यात येऊ लागली.
अनेक प्रवाशी ऐन उन्हाळ्यात सावलीचा आसरा घेत एसटीची प्रतीक्षा करीत आहेत. ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही. एसटी स्थानकात शौचालय देखील नसल्याने प्रवाशांसह महिलांची कुचंबना होत आहे. मात्र, याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, याबाबत आगार प्रमुख व आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधल्यास ते एकमेकांसह नागरिकांकडे बोट करत असल्याचे दिसत आहे.
याबाबत शिक्रापूर एस टी स्थानक व्यवस्थापक दिलावर तांबोळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पाणी व शौचालयाबाबत अद्याप काही व्यवस्था केली नाही. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करु तसेच स्थानिक युवकांचे त्याबाबत काहीतरी नियोजन सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्रापूर येथील एसटी स्थानकाच्या समस्येबाबत शिरुर आगर प्रमुख मनीषा गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता शिक्रापूर स्थानकात समस्या उपाय ग्रुप पाणी पुरवते. शौचालय देखील बांधले असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधाभास वक्तव्य
शिक्रापूर येथील एसटी स्थानकाच्या समस्येबाबत एसटी स्थानक व्यवस्थापक दिलावर तांबोळी हे काहीही व्यवस्था नसल्याचे तर शिरुर आगार प्रमुख मनीषा गायकवाड या सर्व सुविधा असल्याचे सांगत असल्याने हे जबाबदार व्यक्ती एकमेकांसह नागरिकांकडे बोट करीत असल्याचे दिसत आहे.