शिक्रापूर, (वार्ताहर)- जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथे (दि.२३) रोजी मध्यरात्री पडलेल्या दरोेड्यात ज्येष्ठ महिलेवर प्राणघातक हल्ला करीत खून करुन चोरी केल्याप्रकरणी फरार सराईताला पाठलाग करुन जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
अविनाश उर्फ लंगड्या रमेश काळे (रा. कोळगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. जातेगाव बुद्रुक येथील कृष्णाबाई इंगवले या घरात झोपलेल्या असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करुन कृष्णाबाई यांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे दागिने व काही रक्कम चोरून नेली होती,
दरम्यान, चोरट्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये कृष्णाबाई ज्ञानेश्वर इंगवले यांचा जागीच मृत्यू झाला होता. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्हीसह आदी माहिती संकलित करुन यापूर्वी शिक्रापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी प्रवीण भोसले व सोनू उर्फ समीर निकम भोसले (दोघे रा. तळेगाव दाभाडे) यांना अटक केली.
त्यांचे दोन साथीदार फरार असताना त्यांचा शोध घेत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंधारे, जनार्दन शेळके, सागर धुमाळ, शिक्रापूरचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, विकास पाटील, रोहिदास पारखे यांनी वेश बदलून गाठले. पोलिसांना अविनाश दिसला मात्र पोलिसांची चाहूल लागतच अविनाश हा शेतात पळून गेला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करीत शेताला वेढा घालून शिताफीने काळे याला ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करीत आहेत.
आणखी गुन्हे उघडकीस येणार
जातेगाव बुद्रुक येथील महिलेच्या खूनप्रकरणी पोलिसांनी जेरबंद केलेल्या अविनाश ऊर्फ लंगड्या रमेश काळे या आरोपीवर पुणे व अहमदनगर जिल्ह्यात दहांपेक्षा जास्त गुन्हे असल्याची शक्यता आहे. त्याच्याकडून अजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.