एमआयडीसी व पोलिसांची अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई
बारामती – बारामती एमआयडीसीतील पेन्सिल चौकानजीक वाढलेल्या अतिक्रमणांवर बुधवारी (दि. 5) एमआयडीसीचे अधिकारी व तालुका पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईमुळे पेन्सिल चौकाने मोकळा श्वास घेतला आहे.
भिगवण रस्त्यावरील पेन्सिल चौकात अतिक्रमणांमुळे बकालपणा वाढला होता. खाद्यपदार्थांसह चहाच्या टपऱ्या, फळ विक्रेते यांनी चौकाला वेढा घातला होता. त्यात चौकातील फलकांनी भर घातली होती. पेन्सिल चौकातील अतिक्रमणांना कोणताच धरबंद राहिलेला नव्हता. मनाला येईल त्याने चौकात व्यवसाय थाटावा, अशी स्थिती येथे निर्माण झाली होती.
बुधवारी बारामती एमआयडीसीचे अधिकारी तसेच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप व सहकाऱ्यांनी रस्त्याच्या कडेच्या छोट्या टपऱ्या, स्टॉल हटवत रस्ता मोकळा केला. यापुढील काळात या भागात अतिक्रमणे होवू नयेत, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे घोलप यांनी सांगितले.