जलयुक्‍त शिवार संकलन निधीत 19 लाखांचा अपहार

नगर  – राज्य शासनाच्या जलयुक्‍त शिवार योजनेच्या कामांसाठी मंजूर झालेल्या जलयुक्‍त शिवार संकलन निधी नावाने बॅंकेत खाते उघडून त्याचा कोणाताही हिशोब न ठेवता परस्पर त्या खात्यातून 19 लाख 27 हजार 986 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नगर तालुक्‍यातील मजले चिंचोली ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नगर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मजले चिंचोलीचे तत्कालीन उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्कालीन उपसरपंच धर्मनाथ आंनद आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत पोपट जऱ्हाड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ठकाराम तुपे यांनी ही फिर्यादी दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, 1 जानेवारी 2016 ते 1 डिसेंबर 2018 या दरम्यान मजले चिंचोली ग्रामपंचायतचे उपसरपंच धर्मनाथ अव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत जऱ्हाड यांनी संगमताने जेऊर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत जलयुक्‍त शिवार संकलन निधी नावाने खाते संयुक्‍त उघडले. या खात्यातून 17 लाख 69 हजार 456 रुपयांचा अपहार केला.

तसेच पाणीपट्टी वसुलीचे बेकायदेशीर खाते उघडून त्यातून 1 लाख 58 हजार 530 रुपयांचा देखील अपहार केला. याबाबत चौकशी केली असता हा अपहार झाल्याचे समोर आले आहे. मजले चिंचोली ग्रामपंचायतीमधील अपहारचा दुसरा गुन्हा हा दाखल आला आहे. त्यापूर्वी महिला सरपंचच्या बोगस स्वाक्षऱ्या करून सुमारे 57 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी उपसरपंच धर्मनाथ आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत जऱ्हाड यांच्या विरूद्ध यापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पुन्हा जलयुक्‍त शिवार योजनेच्या कामांच्या निधीचा अपहार झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.