नगर – विविध देशातील व राज्यातील सहकारी पतसंस्था विषयक कायदे, सहकारी पतसंस्थेची कार्यपद्धती या विषयावर चर्चा करण्यासाठी तसेच विविध राज्यात व विविध देशात असलेल्या सहकारी पतसंस्थांचे कायदे व कार्यपद्धती याचा अभ्यास करून आदर्श कायदे व आदर्श कार्यपद्धती संपूर्ण जगात एकाच पद्धतीने कशी राबवता येईल याबाबत विचार विनिमय करण्यासाठी शिर्डी येथे शनिवार दि.15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.00 वा. आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत थायलंड, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका तसेच कर्नाटक, गुजराथ, गोवा, मध्य प्रदेश येथील पतसंस्था फेडरेशनचे व पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.
जिल्हाउपनिबंधक दिग्विजय आहेर म्हणले, शिर्डी येथील राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या सहकार प्रशिक्षण व संशोधन केंद्र येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय सहकार संवाद मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, उर्जा व उच्च शिक्षण मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या सह आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेस आंतरराष्ट्रीय स्थरावरील सहकारी पतसंस्था संघटना असलेल्या असोसिअशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडीट युनियनचे अध्यक्ष रणजित हेत्तीयाराची, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती इलेनिता सॅंड्रॉक या उपस्थित राहणार असल्याने या परिषदेचे अनन्यसाधारण महत्व आहे.
तसेच महाराष्ट्राचे सहकार आयुक्त अनिल कवडे, अप्पर निबंधक डॉ. पी. एल. खडांगळे, उपनिबंधक मिलिंद सोबले , विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशीक श्रीमती ज्योती लाटकर यांच्या सह महाराष्ट्रातील सहकार खात्याच्या विविध पदावर कार्यरत असलेले अधिकारी व पतसंस्था चळवळीतील प्रमुख पदाधिकारी या अंतरराष्ट्रीय सहकार परिषदेस उपस्थित राहणार आहे. यावेळी नगर स्थैर्यनिधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, नाशिक विभागीय फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, संचालक शिवाजी कपाले, काडूभाऊ काळे, स्वप्नील देसाई, साबाजी गायकवाड, अशोक कटारिया, सुशीला नवले, पुखराज पिपाडा, आरती कटारिया, विठ्ठल अभंग, उमेश मोरगावकर, आदिनाथ हजारे आदि उपस्थित होते.
पतसंस्थांच्या प्रश्नांबाबत सहकार मंत्र्यांकडे दाद मागणार
शिर्डी येथे होणाऱ्या राज्यव्यापी सहकार मेळाव्याची माहिती देताना नगर जिल्हा स्थैर्यनिधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले की, महाराष्ट्रातील पतसंस्थांच्या विविध प्रश्नांवर विशेषतः सध्या ज्या विषयावर महाराष्ट्रातील पतसस्थांमध्ये असंतोष पसरत आहे तो नियामक मंडळ व नियामक मंडळाने लादलेले अंशदान, पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर महाराष्ट्र शासन व सहकार खात्याकडे या परिषदेत दाद मागण्यात येणार आहे.