रावळपिंडी – यजमान पाकिस्तानने साफ वर्चस्व राखताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी 95 धावांनी जिंकली व दोन सामन्यांची मालिकाही आपल्या खिशात टाकली. वेगवान गोलंदाज हसन अली याने दोन्ही डावांत मिळून घेतलेल्या10बळींच्या जोरावर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर18 वर्षांनी मालिका विजय प्राप्त केला.
यापूर्वी 2001 साली पाकिस्तानने अशी कामगिरी केली होती. कराचीला झालेली पहिली कसोटी पकिस्तानने 7 गडी राखून जिंकली होती. या दुसऱ्या सामन्यासह ही मालिकाही त्यांनी 2-0 अशी जिंकली. पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात 272 धावा केल्या होत्या.
त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 201 धावांत गुंडाळून पाकिस्तानने मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या दुसऱ्या डावात महंमद रिझवानच्या शतकाच्या जोरावर 298 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेला हे आव्हान पेलवले नाही व त्यांचा दुसरा डाव 274 धावांवर संपूष्टात आला व पाकिस्तानने हा सामना 95 धावांनी जिंकला व मालिकाही 2-0 अशी खिशात टाकली.