क्रिकेट कॉर्नर : पुजारा, पंत व सुंदरनेच ठेका घेतला आहे का ?

-अमित डोंगरे

आयपीएल संपली आणि भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला गेला. तिथे पराभव ठरला होता मात्र, अचानक चमत्कार घडला आणि चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी पठाणी वसुली करत ही मालिका भारतीय संघाच्या शिखात येईल हे पाहिले. पण ते डिझास्टर मॅनेजमेंट होते पण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या डावातील फलंदाजी पाहिल्यावर तेच रुटीन बनल्यासारखे वाटू लागले आहे.

सलामीवीरांनी निराशा करायची, कर्णधार विराट कोहलीने हजेरी लावायची आणि धावा करण्याचे व वेळ खेळून काढण्याचे काम पुजारा व पंत यांनी तर नंतर वॉशिंग्टन सुंदर व रवीचंद्रन अश्विन यांनी करायचे. हे म्हणजे असे झाले की आधी येणाऱ्या फलंदाजांनी हजेरी पटावरचे कारकुन व्हायचे व मुख्य सादरीकरण मधल्या फळीने तसेच तळातील फलंदाजांनी करायचे. या संघाला काय झाले हे तेच समजत नाही. चेतेश्वर पुजारा व पंत यांनी या डावात धिराने व जिद्दीने फलंदाजी केली नसती तर पाटा खेळपट्टीवर रविवारीच फॉलोऑनची नामुष्की स्वीकारावी लागली असती.

गेल्या अनेक महिन्यांत आपण जे काही कसोटी क्रिकेट खेळलो त्यात आपल्या फलंदाजांनी आपल्या विकेट कशा घालवल्या ते पाहिले तर ही फलंदाजी जागतिक दर्जाची आहे असे म्हणायला जीभ रेटत नाही. हिटमॅऩ रोहित शर्मा विश्रांतीवर होता, त्यावेळी सो-कॉल्ड प्रति सचिन म्हणून नावाजला जात असलेला पृथ्वी शॉ सातत्याने अपयशी ठरत होता.

दुसरीकडे शिखर धवन संघात नाही हे सांगताना वाईट वाटत नाही तर आनंद होत आहे. कारण तो संघातील जागा धोक्‍यात आली की अर्धशतक करतो व पुढील काही काळ जागा उबवतो. शुभमन गिलला जास्तीत जास्त संधी द्यायला हवी तेच आपले इंडिया मटरियल आहे. मात्र, रोहित संघात परतल्यावर तो ज्या पद्धतीने बाद होतोय ते पाहता हा माणूस अद्याप कसोटीला सरावलेला वाटतच नाही. तसेच पालकत्व रजा संपवून संघाचे नेतृत्व हाती घेतलेल्या कोहलीला अद्याप नामकरणाच्या आनंदातून बाहेर यावेसे वाटत नसल्याचेच दिसत आहे.

अजिंक्‍य रहाणेच्या कामगिरीचे कौतुक मागे पडले व तो देखील एका अप्रतिम झेलाचा बळी ठरला. मात्र, त्याच्या खेळीचे निरीक्षण केले तर लक्षात येते की त्याचेही तंत्र त्यानेच पुन्हा एकदा घोटून पक्के केले पाहिजे. ऑन द राईज चेंडूवर स्टेपआऊट होऊन खेळण्याची गरज नव्हती. पुजारा बाद झाला तेव्हा इंग्लंडने सुस्कारा सोडला असेल पण पंत बाद झाला तेव्हा त्यांनाही वाईट वाटले असेल. चांगल्या खेळीनंतर पंतचे हुकलेले हे दुसरे कसोटी शतक ठरले. त्याच्याकडे गुणवत्ता ठासून भरली आहे पण ही गुणवत्ता बेदरकार आहे. आता त्याला शिस्त लागली पाहिजे.

इतक्‍या मोठ्या स्तरावर खेळताना सुरूवातीला सचिनही असाच बेदरकार होता अगदी व्हिव रिचर्डससारखा पण नंतर त्याने स्वतःला शिस्त लावून घेतली व त्यानंतरच तो महान बनला. पंत त्या उंचीवर जाईल का नाही हे सांगता येत नाही पण प्रयत्न करुन पाहायला काय हरकत आहे.

सुंदरने केलेली फलंदाजी या सामन्यातही महत्वाची ठरली अन्यथा नामुष्कीसमोर उभी ठाकलेली होती. या निमित्ताने निवड समिती, रवी शास्त्री व कर्णधार कोहली यांना एकच विचारावेसे वाटते की दरवेळी प्रमुख व स्टार समजल्या जात असलेल्या फलंदाजांनी नांगी टाकायची व पुजारा, पंत, अश्‍विन व सुंदर यांनीच ठेका घ्यायचा का, मग तुमचे स्टारपद कधी उपयोगी ठरणार. केवळ विक्रमासाठी खेळण्यापेक्षा संघासाठी खेळा रे…

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.