मृत्यूचे तांडव! देशात सलग तिसऱ्या दिवशी करोनामुळे १ हजारांपेक्षा जास्त मृत्यू

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरशः नकोनको करून सोडले आहे. देशातील काही राज्यात तर या कोरोनाने थैमान सुरु केला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली पाठोपाठ देशातील इतर राज्यांतही करोनाने हातपाय पसरले आहेत. देशात पहिल्या लाटेतील उच्चांकांच्या दुप्पट रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेत नोंदवली गेली आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा विक्रमी रुग्णवाढ नोंदवली गेली असून, मृत्यूचा आकडाही हजारांच्या पुढे आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात १ हजारांपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून, गेल्या २४ तासांत देशात दोन लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण झाली. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील गेल्या २४ तासांतील करोना परिस्थितीची आकडेवारी जाहीर केली आहे. यात रुग्णासंख्या वाढीबरोबरच मृत्यूंची संख्या वाढत असल्याचेही समोर आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत तब्बल २ लाख १७ हजार ३५३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १ लाख १८ हजार ३०२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

चिंतेची बाब म्हणजे देशातील मृतांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी एक हजारांच्या पुढे आहे. २४ तासांत भारतात १ हजार १८५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७४ हजार ३०८ झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.