भोर -भोर तालुक्यात आजअखेर करोनाबाधितांची संख्या 64 होती, त्यात आज (दि. 10) आणखी 6 बाधित रुग्णांची भर पडली असून, तालुक्यातील बाधितांची संख्या 70 झाली आहे. यातील 25 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, 45 रुग्णांवार उपचार सुरू असल्याची माहिती भोर तालुका पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे आणि गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली.
चार दिवसांपूर्वी 49 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले होते. त्यापैकी आज (दि.10) 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यात भाटघर धरण भागातील राजघर येथील 5 आणि खानापूर येथील महिलेचा समावेश आहे. राजघर येथील 1 आणि पसुरे येथील 1 असे दोन जण रोज नोकरीनिमित्ताने भोर-पुणे अप-डाऊन करीत होते. राजघर येथील बाधिताच्या संसर्गात आलेल्या पाचजणांचे अहवाल (दि. 10) पॉझिटिव्ह आले आहेत, खानापूर (ता. भोर) येथील रुग्णाच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
भोर तालुक्यातील बाधितांची संख्या वाढत असल्याने व पुणे येथे हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने भोरमधील बाधितांवर भोरच्या औद्योगिक केंद्रात उपजिल्हा रुग्णालयाच्या व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार देण्यात येत आहेत. गंभीर स्वरुपातील रुग्णांना पुणे येथे वर्ग करण्यात येत असून भोरमध्येच कोव्हिड केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.