उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीने घेतला रेशन दुकानदाराचा चावा

बिहार पोलिसांकडे परस्परांविरुद्ध तक्रार : क्षुल्लक कारणावरून  थेट भांडण

पाटणा – बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या बहिणीने वादातून घडलेल्या भांडणात चक्क रेशन दुकानदाराचाच चावा घेतल्याची घटना घडली आहे. सध्या या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांची बहीण रेखा मोदी यांनी रेशन दुकानदाराचा चावा घेतला हे वृत्त सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट भांडणात झाले व संतापाच्या भरात रेखा यांनी दुकानदाराचा चावा घेतला. हे वृत्त समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत दोन्ही बाजूने परस्परांविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे.

रेखा यांनी येथील एका रेशन दुकानदाराकडून दोन पोती तांदूळ खरेदी केले व ती पोती घरपोच करण्यास सांगितले. मात्र, ही तांदळाची पोती संबंधित दुकानदाराने घरी पोहोचवली नाही म्हणून त्यांनी जाब विचारला त्यातून वाद निर्माण झाला.

हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात रेखा यांनी या दुकानदाराच्या हाताचाच चावा घेतला. पोलिसांनी रेखा आणि दुकानदाराला पोलीस स्टेशनला नेले. तिथेही रेखा यांनी मोठा गोंधळ घातला. अखेर दुकानदाराने तांदळाच्या पोत्यांची रक्‍कम रेखा यांना परत दिल्याने हा वाद संपुष्टात आला.

उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांची रेखा या बहीण असली तरीही त्यांच्याशी कोणताही संपर्क नसल्याचे त्याचबरोबर रेखा यांच्याशी आता आपले कोणतेही नाते नसल्याचेही मोदी यांनी अनेकदा स्पष्ट केल्याने या वादात बिहार सरकार हस्तक्षेप करणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, या घटनेवर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.