पिरंगुट -मुळशी तालुक्यात आज दिवसभरात करोनाचे नऊ रुग्ण आढळून आले. तालुक्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या 169 झाली आहे. 43 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी संदीप जठार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांनी दिली.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये पाच पुरुष तर चार महिलांचा समावेश आहे. भुकूममध्ये एक, कासारसाईत एक, शिंदेवाडीत एक, बावधन मध्ये एक, मारुंजीत तीन, नांदेत एक तर पिरंगुट मध्ये एक रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. बुधवारी (दि. 8) मुळशीत उच्चांकी 26 रुग्ण आढळून आले होते. गेल्या आठ दिवसांत तालुक्यात जास्त रुग्ण आढळून येत होते. त्यामानाने आजची संख्या काही अंशी दिलासा देणारी आहे.
आतापर्यंत तालुक्यात एकूण रुग्ण संख्या 169 झाली आहे. यापैकी 43 रुग्ण बरे झाले आहेत. करोना बाधितांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे मुळशीकरांनो योग्य ती काळजी घ्या. गरज असेल तरच घराबाहेर पडा. मास्कचा वापर करून सोशल डिस्टनसिंग पाळले पाळा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.