कोविड सेंटरमध्ये 600 बेडचे नियोजन
पुणे – शहरातील करोनाबाधितांचा आकडा वाढतानाच गंभीर रुग्णांचाही आकडा वाढत आहे, अशा अचानक गंभीर झालेल्या रुग्णांना तातडीने ऑक्सिजन न मिळाल्यास त्याचा मृत्यू होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा रुग्णांसाठी आता महापालिकाही ऑक्सिजन बेड उभारणार आहे.
पालिकेच्या 1 हजार पेक्षा अधिक बेडची क्षमता असलेल्या सहा कोविड सेंटर मध्ये प्रत्येकी 100 प्रमाणे हे 600 बेड तयार केले जाणार आहेत. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली.
महापालिकेकडून शहरात जुलैअखेरपर्यंत सुमारे 47 हजार करोनाबाधित रुग्ण अपेक्षित धरले आहेत. तर, त्यानंतरही ही साथ आटोक्यात न आल्यास शहरात मोठ्या प्रमाणात बेडची आवश्यकता भासणार आहे. सध्या, महापालिकेने काढलेल्या अंदाजानुसार, जुलै अखेरपर्यंत शहरात 19 हजार सक्रिय बाधित असणार असून त्यातील सुमारे 2574 जणांना ऑक्सिजनची सुविधा असलेले बेड आवश्यक असणार आहेत. मात्र, पालिकेकडून खासगी हॉस्पिटलचे बेड नियंत्रित केल्यानंतरही पालिकेस केवळ 1960 बेडच उपलब्ध होणार आहेत.
तर हा रुग्णांचा आकडा आणखी वाढल्यास रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पालिकेने आता मोठ्या क्षमतेच्या कोविड केअर सेंटरमध्ये पोर्टेबल ऑक्सिजन बेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात, बालेवाडी, निकमार, सिंहगड कॉलेज वसतिगृह, ट्रिनिटी कॉलेज वसतिगृह, सीओईपी महाविद्यालय या ठिकाणी हे ऑक्सिजन बेड उपलब्ध केले जाणार आहे.
पोर्टेबल सिलिंडरचा वापर
ऑक्सिजन 600 बेड उभारताना पालिकेकडून पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडरचा वापर केला जाणार आहे. त्यात प्रत्येक बेडसाठी प्रत्येक रुग्णाला 2 ऑक्सिजन सिलिंडर असणार आहेत. त्यानुसार, सुमारे 1200 ऑक्सिजन सिलिंडर तसेच ते बसविण्यासाठीची तात्पुरती यंत्रणा महापालिका उभारणार आहे. मात्र, प्रत्येक सिलिंडरसाठी सुमारे 7 हजार रुपयांचा खर्च असल्याने पालिकेकडून राज्यशासनाकडे सिलिंडरच्या किमती नियंत्रित करण्याबाबतही मागणी केली जाण्याची शक्यता आहे.