पॅरिस -ब्राझीलमधील करोना संकट दिवसागणिक आणखी तीव्र बनत आहे. त्या देशाने करोनाबाधित संख्येत 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्याशिवाय, करोना संसर्गाने आतापर्यंत ब्राझीलमध्ये 49 हजारांहून अधिक बाधितांचा बळी घेतला आहे.
जगातील 213 देश आणि प्रदेशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. जगभरातील करोनाबाधितांची संख्या 88 लाखांच्या घरात आहे. तर, करोनाची लागण झालेले 4 लाख 63 हजारांहून अधिक जगभरातील बाधित आतापर्यंत दगावले आहेत. करोना कहराचा सर्वांधिक फटका अमेरिकेला बसला आहे. त्या देशातील बाधितांची संख्या जगाच्या एक-तृतीयांशपेक्षा अधिक आहे. अमेरिकेत सुमारे 23 लाख नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. त्या देशात करोनाने 1 लाख 21 हजारांपेक्षा अधिक बाधितांचा बळी घेतला आहे. करोनाबाधित आणि बळींच्या संख्येशी संबंधित जागतिक क्रमवारीत अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे. तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या रशियात 5 लाख 77 हजारांच्या आसपास बाधित आहेत. रशियात करोनाने 8 हजार बाधितांचा बळी घेतला आहे.
बाधित संख्येच्या जागतिक क्रमवारीत भारत चौथ्या स्थानी आहे. पाचव्या स्थानी असलेल्या ब्रिटनने 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. भारताचे शेजारी देश असणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशमधील स्थितीही चिंताजनक आहे. पाकिस्तानमधील बाधितांची संख्या पावणे 2 लाखांच्या घरात पोहचली आहे. तो देश जागतिक क्रमवारीत 13 व्या, तर बांगलादेश 17 व्या स्थानी आहे. बांगलादेशात 1 लाखपेक्षा अधिक बाधित आहेत. करोना संकट अजूनही गहिरेच असले तरी बाधित बरे होण्याचे प्रमाण जगासाठी दिलासादायक ठरत आहे. आतापर्यंत सुमारे 47 लाख म्हणजेच जगातील निम्म्याहून अधिक बाधित करोनामुक्त झाले आहेत.