मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपुत याने केलेल्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सर्वच पातळ्यांवर सुरू असून त्यांनी या संबंधात यशराज फिल्म्स कंपनीने सुशांतसिंह याच्याशी केलेल्या एका चित्रपटाच्या कराराची प्रत मागून घेतली होती. त्यानुसार या कंपनीने ती प्रत आज पोलिसांना सादर केली आहे. या करारानुसार सुशांतसिंह या कंपनीच्या पानी नावाच्या एका नवीन चित्रपटात काम करणार होता व त्याचे दिग्दर्शन शेखर कपूर हे करणार होते. पण सदर कंपनीने हा प्रकल्पच रद्द केला आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आत्तापर्यंत चित्रपटसृष्टीतील पंधरा जणांची चौकशी केली असून त्यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती व कास्टींग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांचाही समावेश आहे. सुशांतसिंह याने यशराज बरोबर केलेला करार रद्द केला होता व त्याने रिया चक्रवर्ती हिलाहीं हा करार रद्द करण्याची सुचना केली होती अशी माहिती रियाने पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी यशराज कंपनीकडे या कराराची प्रत मागवली होती. सुशांतसिंह याने सन 2013 साली शुद्ध देसी रोमान्स आणि सन 2015 साली डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी या यशराज कंपनीच्या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे.