Corona update : चिंता वाढली, पुण्यात बाधितांचा आकडा सातशे पार

24 तासात 743 करोनाबाधित !

पुणे(प्रतिनिधी) – पुणे शहरात आज गेल्या 24 तासांत तब्बल 743 करोनाबाधित रुग्ण आढळले असून, प्रशासनाने अधिक सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन केले नाही तर यवतमाळ, अमरावती आणि नागपूर शहरांप्रमाणे पुण्यातही लॉकडाऊन करण्याची वेळ येईल अशी स्थिती हळू हळू निर्माण होत आहे.

बाधित रुग्णांची संख्या आता पुन्हा एकदा वेगाने वाढत चालली असून, त्याचबरोबर गंभीर रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. तसेच बाधितांची संख्या दोन लाख होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. सध्या बाधितांची संख्या 1 लाख 99 हजार 696 झाली असून त्यातील 1 लाख 91 हजार 300 रुग्ण बरे झाले आहेत.

बाधित रुग्णांमधील 3,559 रुग्ण अॅक्‍टीव्ह असून 207 रुग्णांची स्थिती गंभीर आहे. गेल्या चोवीस तासात चार रुग्णांचा मृत्यु झाला असून, त्यातील एक रुग्ण पुण्याबाहेरील आहे. आजपर्यंत 4,867 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

पहिला डोस घ्या – आरोग्य विभागाचे आवाहन

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लस घ्यावी, असे आवाहन राज्याच्या लसीकरण विभागातर्फे करण्यात आले आहे. अद्यापही पहिल्या टप्प्यातील हेल्थकेअर वर्कर्सचे लसीकरण पूर्ण झाले नाही. जागृती होऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने फ्रंटलाइन वर्कर्सच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. हेल्थकेअर वर्कर्सना डेडलाइन दिली असून, त्याच्या आत सगळ्यांनी पहिला डोस घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

दिवसभरात 382 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आजपर्यंत 11 लाख 14 हजार 668 संशयितांची स्वॅब टेस्ट झाली असून, बुधवारी दिवसभरात 6514 संशयितांची टेस्ट करण्यात आली.

बाधितांची संख्या बुधवारीही वाढल्याने जास्त चिंता व्यक्त केली जात आहे. परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाऊन लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय हॉटस्पॉटची संख्याही वाढत असून, महापालिकेने मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्याला सुरूवात केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.