पुणे – जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीणमध्ये एकूण 235 नवीन बाधित सापडले. त्यामध्ये तीनही कार्यक्षेत्रात आज शंभरीच्या आतच रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. शहर आणि ग्रामीणमध्ये करोनामुळे आज एकही मृत्युची नोंद नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये एकाचा करोनामुळे मृत्यु झाला. दरम्यान, दिवसभरात 398 बाधित करोनामुक्त झाले आहेत.
पुणे शहरातील बाधित संख्येत लक्षणीय घट होत असून, आज 57 बाधित सापडले. पिंपरी-चिंचवडमध्ये 64, ग्रामीणमध्ये 96 तर नगरपरिषद कार्यक्षेत्रात 15 बाधित सापडले. तर आजही पुणे शहर आणि ग्रामीणमधील बाधितांपेक्षा करोनामुक्त बाधितांची संख्या दुप्पट आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 82 लाख 35 हजार 630 जणांच्या नमुने तपासणीतून 11 लाख 50 हजार 724 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर त्यातील 11 लाख 28 हजार 706 बाधित करोनामुक्त झाले आहेत.