कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने विरोधकांच्या ऐक्यासाठी प्रयत्न करत नसल्याबद्दल कॉंग्रेसवरील टीकेची धार वाढवली आहे. एवढेच नव्हे तर, ट्विटरची जागा व्यापण्यापुरता पक्ष असा कॉंग्रेसचा उल्लेख केला आहे.
विरोधकांच्या ऐक्याविषयी सहमती दर्शवल्याने कॉंग्रेस आणि तृणमूलमधील जवळीक वाढत असल्याचे चित्र होते. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. विरोधकांच्या ऐक्यासाठी कॉंग्रेस हालचाली करत नसल्याची नाराजी तृणमूल वारंवार व्यक्त करत आहे. अशात तृणमूलच्या मुखपत्रातून कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
भाजपविरोधात आघाडी स्थापन करण्यासाठी आम्ही अनुकूल आहोत. त्याबाबतची भूमिका आम्ही कॉंग्रेसकडेही मांडली. मात्र, कॉंग्रेसचा दृष्टीकोन उदासीन आहे. त्या पक्षाने कुठलाही पुढाकार घेतलेला नाही. असाच दृष्टीकोन कॉंग्रेसने 2014 आणि 2019 मधील लोकसभा निवडणुकांवेळीही ठेवला.
कॉंग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी उभी करण्याची भाषा आम्ही कधीच केली नाही. मात्र, इतरांसाठी स्वस्थ बसण्यात आम्ही वेळ घालवणार नाही. इतर राज्यांतही विस्तारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे तृणमूलने म्हटले. अर्थात, राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्याच्या उद्देशातून कॉंग्रेससाठी दरवाजे खुले ठेवण्याची तयारीही तृणमूलने दर्शवली आहे.