आकडा 183 वर : दिवसभरात 170 जणांना डिस्चार्ज
पुणे – मागील दोन दिवसांपासून शहरात करोना बाधितांची संख्या काही अंशी कमी होत आहे. मात्र, अत्यवस्थ बाधितांची संख्या आणि मृत्यूंची संख्याही वाढतच आहे. गेल्या 24 तासांत आणखी 7 अत्यवस्थ रुण वाढले असून, एकूण संख्या 183 झाली आहे. त्यामध्ये 45 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. आज नव्याने 182 बाधितांची भर पडली असून, बरे झालेल्या 170 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरात करोना बाधितांची संख्या 7, 447 वर गेली असून, दिवसभरात 1, 656 जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. सध्या 2,402 बाधितांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून, नायडू आणि त्याअंतर्गत असलेल्या रुग्णालयांत 1,662, ससून-161 तर खासगी रुग्णालयात 579 बाधित उपचार घेत आहेत. तसेच 6, 133 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांत करोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यातील एक मुंबई येथील 74 वर्षीय व्यक्तीचा नोबेल रुग्णालयात गुरुवारी रात्री मृत्यू झाला. तर अन्य 8 मृत व्यक्ती हे कोंढवा खुर्द, कॅम्प, कोंढवा, न्यू नाना पेठ, लक्ष्मीनगर, घोरपडी पेठ, कोरेगाव पार्क या परिसरातील आहे. साधारण 45 ते 80 या वयोगटातील असून, 5 महिला व 3 पुरूषांचा समावेश आहे. यातील बहुतांश व्यक्तींना जुने आजार होते.