फलटण – फलटणनजीकच्या कोळकी येथील दोघांचे आणि जोरगाव, ता. फलटण येथील तिघांचे करोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यात बाधितांची संख्या वाढत असून मुंबईतून आलेले 27 रुग्ण आजअखेर पॉझिटिव्ह आढळले आहेत.
चेंबूर (मुंबई) येथून कोळकी येथे दि. 24 मे रोजी कुटुंबासह आलेली 50 वर्षांची महिला व 25 वर्षे वयाचा युवक यांचे कोव्हिड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याच कुटुंबातील 54 वर्षांच्या पुरुषाचा अहवाल सोमवारी (दि. 1 जून) पॉझिटिव्ह आला होता. त्याचा दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. 2) सातारा येथे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. मुंबई परिसरातून जोर (वाखरी) येथे आलेल्या एका 12 वर्षांच्या मुलाच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या हाय रिस्क कॉंटॅक्टमध्ये आलेल्या शेजारच्या घरातील 25 वर्षांची युवती व 21 वर्षांच्या युवकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे दोघे कोपरखैरणे येथून गावात आले होते.
दरम्यान, दि. 2 रोजी स्वॅब घेतलेल्या 30 पैकी 23 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. नव्याने बाधित झालेल्या पाच व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून जोरगाव ग्रामपंचायत आणि कोळकी ग्रामपंचायत हद्दीतील भुजबळ मळा हा भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
————————-