नवी दिल्ली: कॉंग्रेस पक्षाने लोकभेतील कॉंग्रेसचे माजी नेते मल्लिकार्जून खरगे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा गुलबर्गा मतदार संघातून पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना आता राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे.
खरगे हे पक्षाचे सरचिटणीस असून त्यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारीपद आहे. ते कर्नाटकातील प्रभावी दलित नेते आहेत. त्यांनी लोकसभेतही कॉंग्रेसचे नेतृत्व यशस्वीपणे सांभाळले होते, पण सध्या ते संसदेच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना राज्यसभेत संधी देण्यात आली आहे. कर्नाटकात राज्यसभेच्या निवडणुका येत्या 19 जून रोजी होत आहेत. या निवडणुकीसाठी मल्लिकार्जून खरगे यांना संधी मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे.