सिंहगड रस्ता -‘मिशन 45′ गाठताना बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार महायुतीचाच असेल, असा निर्धार करीत “महाविजय 2024′ साकारण्यासाठी विविध मुद्द्यांवर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खडकवासला, पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.
बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा बावनकुळे करीत आहेत, या दरम्यान धायरी येथे कार्यकर्त्यांशी बोलत होते. ते म्हणाले की, अमेठी जिंकली आता लक्ष बारामती लोकसभेवर आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागले पाहिजे. यावेळी मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांशीही बावनकुळे यांनी संवाद साधला.
धायरी येथे कोपरा सभा झाली. “मेरी माटी मेरा देश’ या अभियान अंतर्गत खडकवासला, पुरंदर, भोर मतदार संघातील 60 हजार घरांमध्ये प्रदेशाध्यक्ष संपूर्ण पथकासह जाणार असल्याचे सांगितले. यावेळी रोड शोच्या दरम्यान बावनकुळे यांनी रस्त्यावर उतरत “पुढचे पंतप्रधान कोण?’ असा प्रश्न नागरिकांना विचारला. यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, शहराध्यक्ष धीरज घाटे, काळे, सचिन मोरे, अरुण राजवडे, हरिदास चरवड, राजाभाऊ लायगुडे आदी उपस्थित होते.