पिंपरी – महापालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण होऊन हरकतींचा निपटारा झाला आहे. शहरात 19 हजार 697 फेरीवाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, यामधील तब्बल 5 हजार 75 फेरीवाल्यांनी कागदपत्रेच महापालिकेकडे जमा केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांना कागदपत्रे जमा करण्यासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली असल्याची माहिती भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय सरनाईक यांनी दिली.
उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या शहरात कामगार, कष्टकरी, उद्योजक यांचा अधिवास अधिक आहे. शहरात मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. शहराच्या इंडेक्समध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली असून यामध्ये नागरिक आणि फेरीवाले यांची भूमिका महत्वाची आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने शहरातील पथारीवाल्यांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.
आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले. शहरातील फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाला दि. 1 नोव्हेंबर 2022 रोजी सुरुवात झाली. त्यानंतर सर्वेक्षण पूर्ण न झाल्याने दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. 10 जानेवारीपर्यंत दिलेल्या अंतिम मुदतीत शहरात 19 हजार 697 फेरीवाले आढळून आले आहेत. या फेरीवाल्यांच्या अंतिम यादीला भूमी आणि जिंदगी विभागाने मान्यता दिली. मात्र, यामधील 13 हजार 989 फेरीवाल्यांना ऑफलाइन आणि ऑनलाइन कागदपत्रे जमा केली आहेत. यामधील 5 हजार 75 जणांनी कागदपत्रे जमा केलेली नाहीत. त्यांना कागदपत्रे जमा करण्याची 20 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे.
दरम्यान, 20 ऑक्टोबरला शहर फेरीवाला समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत फेरीवाल्यांसाठी झोन निश्चित करण्यात येणार आहेत. तोपर्यंत जेवढे फेरीवाले कागदपत्रे जमा करतील, त्यांनाच मान्यता दिली जाणार आहे.