“आरटी पीसीआर’ चाचण्यांसाठी अत्याधुनिक उपकरणाचे अनावरण
पुणे – करोनाचा संसर्ग ज्या प्रमाणात वाढत आहे, त्या प्रमाणात चाचण्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे संसर्गाला प्रतिबंध करणारी लस किंवा औषध सापडत नाही, तोपर्यंत अधिकाधिक चाचण्या करणे हेच महत्त्वाचे उद्दिष्ट पाहिजे. मात्र, देशात सध्या सुरू असलेल्या चाचण्यांची संख्या अत्यल्प असून, आपण पुरेशा चाचण्यांच्या जवळपासही पोहोचलो नाही, असे मत सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली.
मायलॅब डिस्कवरी सोल्युशन्स बरोबरच्या भागीदारीतून स्वयंचलित “आरटी पीसीआर’ चाचण्यांसाठी तयार केलेल्या उपकरणाचे अनावरण मंगळवारी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये झाले. यावेळी संस्थापक डॉ. सायरस पूनावाला, आदर पूनावाला आणि मायलॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल तसेच डॉ. शैलेंद्र कवाडे उपस्थित होते.
“लक्षणे नसलेल्या व्यक्तीकडून संसर्ग पसरण्याचा धोका मोठा आहे, ही बाब विचारात घेऊन चाचण्यांबाबतचे धोरण बदलण्याची गरज आहे,’ असे सांगत पूनावाला म्हणाले, “कोणाची चाचणी करावी आणि कोणाची नाही याबाबत अद्यापही शासनाचे निर्बंध आहेत. चाचणी करून लागण असलेला रुग्ण लवकर विलग होईल हे पाहणे हिच सध्याची गरज आहे. चाचणी वाढल्यास रुग्णांची संख्या वाढू शकेल. ते घातक नाही. मात्र, मृत्यू झाल्यास ते घातक ठरू शकेल.’
नवे उपकरण सर्वसमावेशक
“कमी जागेत एका मशीनमध्ये करोनासारख्या चाचण्या मानवविरहित करणे शक्य होणार आहे. करोनाबरोबर डेंग्यू, मलेरिया, टीबी, एचआयव्ही, एचपीव्ही कॅन्सरसारख्या विविध चाचण्यादेखील एकाचवेळी करणे शक्य होणार आहे. मायलॅबने विकसित केलेल्या या मशीनमध्ये एका तासात करोनाच्या 32 चाचण्या करणे शक्य होणार आहे. चाचण्या करण्यासाठी आवश्यक तांत्रिक पूर्तता करण्यासाठी स्वतंत्र मशीन आवश्यकता असते. या मशीनमध्येच तशी व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या प्रकारची चाचणी करायची आहे, त्याचे किट्स मशीनमध्ये लावले तर त्याच्यासह अन्य प्रकारच्या चाचण्यांचे किट्स लावून त्यांची चाचणी करता येईल,’ असे मायलॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल यांनी सांगितले.