पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासूनच तरुण नेतृत्वाला वाव देण्याचे काम पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. मंत्रिपदापासून ते सर्वच पदांवर जास्त तरुण नेतृत्वाला संधी देण्यासाठी पक्ष आजही सजग आहे. यामुळे तरुणांसह सर्वांनीच पक्षसंघटन बळकट करावे. पक्ष अग्रस्थानी कसा राहील, याकरीता प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशा भावना माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा 23 वा वर्धापन दिन पुणे शहर कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड, भगवानराव साळुंखे, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ, प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, योगेश जगताप तसेच अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या वतीने अखिल मंडई मंडळाच्या शारदा गणपतीची महाआरती करण्यात आली. शिवाय, प्रार्थना समाज बुधवार पेठ येथे वृक्षारोपण तसेच पुणे शहराच्या विविध ठिकाणी अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.