पुणे – दुचाकीवरून घरी निघालेल्या हॉटेल मॅनेजरला अडवून हत्याराने वार करत त्यांचा खून केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी चोवीस तासांत तिघांना अटक केली. तर, एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. एकाच महिलेवर असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणातून हा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे.
अनिकेत अरूण मोरे (25, रा. धायरी), धीरज शिवाजी सोनवणे (19), सनी उर्फ योगेश हिरामण पवळे (19, रा. दोघे. कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील मोरे हा मुख्य आरोपी आहे. तर, भरत कदम असे खून झालेल्याचे नाव आहे. कदम हे नऱ्हे येथील गारवा बिर्याणीचे मॅनेजर म्हणून काम पाहत होते. दोन दिवसांपूर्वी ते काम संपवून घरी जात असताना सिंहगड रस्ता भागात मोरे आणि त्याच्या साथीदारांनी कदम यांना अडविले.
यानंतर त्यांच्यावर वार करून त्यांचा खून केला. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक तपासावरून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हे धायरेश्वर मंदिरामागे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार सापळा रचून चौघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
चार ते पाच महिन्यांपूर्वी एकाच महिलेवर असलेल्या प्रेमसंबधातून मोरे आणि कदम यांचे वाद झाले होते. याच रागातून हा खून करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक शैलेश संख्ये, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, सहायक निरीक्षक सचिन निकम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.