नाना पेठ परिसरातील घटना : प्रियकराला अटक आरोपी
खून केल्यानंतर झाला होता पसार
पुणे – नाना पेठेत विवाहीत महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकास यश आले आहे. प्रेमप्रकरणातून प्रियकरानेच तिचा खून केला होता. पोलिसांनी संबंधीत प्रियकराला अटक केली आहे.
प्रेम जोधाराम माळी (32, मुळा रोड, खडकी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नाना पेठेत 12 मार्च रोजी एका विवाहित महिलेचा मृतदेह रहात्या घरात आढळून आला होता. दरम्यान, हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
आरोपी प्रियकर प्रेम माळी हा त्याच्या राहण्याचे ठिकाणे बदलत असल्याने त्याला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. दरम्यान, तो स्वारगेट परिसरातील पीएमपी वर्कशॉपजवळील रस्त्यावर उभा असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकातील कर्मचारी सचिन जाधव यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अरुण वायकर, उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, उत्तम बुडगुडे, कर्मचारी तुषार माळवदकर, अजय जाधव, सुभाष पिंगळे, बाबा चव्हाण आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रेम याला ताब्यात घेतले.
माळी हा अविवाहित आहे. तो बिस्कीट आणि सिगारेटचा वितरक म्हणून व्यवसाय करीत होता. त्याचे मयत महिलेसोबत मागील एक वर्षापासून प्रेम संबंध होते. माळी हा तिला पळून जाऊन लग्न करू, असे सांगत होता. मात्र, तिचे आणखी दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असावेत असा माळी याला संशय होता. त्यामुळे तो तिच्यावर चिडून होता. महिलेचा पती कामानिमित्त हैद्राबाद येथे गेल्यानंतर तो तिच्या घरी गेला आणि दोघांचे भांडण झाले. त्याने चिडून ओढणीने महिलेचा गळा आवळून खून केला आणि तो पसार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.