पुणे, दि. 6 -मिळकतकराच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाकडून काही वर्षांपूर्वी थकबाकीदारांच्या दारात बॅंड वाजवित वसुली केली जात होती. मात्र, करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार बंद करण्यात आला होता. मात्र यावर्षी पुन्हा हा बॅंड वाजणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून दिवाळी संपताच ही वसुली मोहीम सुरू केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या कर संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत महापालिकेकडून मिळकतकराच्या थकबाकी वसुलीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत मालमत्ता सील करणे, मालमत्ता जप्त करणे आणि मालमत्तांचा लिलाव करणे, लोक अदालतीत थकबाकीची प्रकरणे सादर करणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी पालिकेने त्यात, बॅंड-बाजा वाजविण्याचीही शक्कल लढविली होती. त्यामुळे अनेक जण हा खेळ दारात नको म्हणून तातडीने थकबाकी भरत होते. मात्र, मागील दोन वर्षांत करोनामुळे आर्थिक संकटाची स्थिती होती. अशा स्थितीतही अनेक प्रामाणिक करदात्यांनी महापालिकेच्या तिजोरीत नियमित कर जमा केलेला आहे. मात्र, काही जणांकडून अद्यापही कर भरण्यास टाळटाळ केली जात असल्याने आता त्यांच्या दारात बॅंड वाजविला जाणार आहे. महापालिकेच्या 2022-23 या वर्षाच्या अंदाजपत्रकात कर संकलन विभागास 2400 कोटींच्या उत्पन्नांचे उद्दिष्ठ देण्यात आले असून, आतापर्यंत 1304 कोटींची वसुली झाली आहे.