पुणे, दि. 6 -कोट्यवधी रुपयांचा खर्च करून महापालिकेकडून हडपसर ते स्वारगेट मार्गावर बीआरटी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, या सेवेसाठी काही भाग वगळता स्वतंत्र मार्गिका केवळ कागदोपत्रीच आहे. असे असताना मार्गिकेच्या दैनंदिन देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली 27 लाखांची उधळपट्टी करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे.
याबाबतची निविदा उद्या (शुक्रवारी) स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अधिकाऱ्यांनी या कामासाठी 44 लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे पुर्वगणकपत्र तयार केले होते. मात्र, प्रत्यक्षात निविदा या खर्चापेक्षा 37 टक्के कमी दराने आली आहे.
महापालिकेने स्वारगेट ते कात्रज आणि स्वारगेट ते हडपसर असा एकूण 16 किलोमीटरचा बीआरटी मार्ग उभारला होता. त्यानंतर, स्वारगेट ते कात्रज मार्गावर उड्डाणपूल तसेच भुयारी मार्ग बांधण्यात आल्याने या ठिकाणी केवळ एक ते दीड किलोमीटरचा मार्ग शिल्लक आहे. तर हडपसर रस्त्यावरही अशीच स्थिती असून, केवळ रामटेकडी उड्डाणपूल ते हडपसर उड्डाणपूल यातील काही भागात बीआरटीची मार्गिका शिल्लक आहे. या लेनचा वापर सर्वच वाहने करत असून, हा बीआरटी मार्ग केवळ कागदावर शिल्लक आहे. मात्र, त्यानंतरही महापालिकेच्या पथ विभागाकडून सोलापूर रस्ता बीआरटी मार्गाची दैनंदिन देखभाल दुरुस्ती करण्याच्या नावाखाली 2022-23 च्या अंदाजपत्रकात सुमारे 2 कोटींची तरतूद केली आहे. दुरुस्तीच्या नावाखाली 44 लाखांची निविदा काढली होती. मात्र, 37 टक्के कमी दराने ही निविदा आली असून, 27 लाख खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर पथ विभागाने ठेवला आहे.
तर बीआरटीचे नाव कशाला?
पथ विभागातील काही अधिकाऱ्यांनी या कामाचे नाव बीआरटी मार्ग असे असले तरी प्रत्यक्षात सर्वच रस्ता दुरुस्त केला जाणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याचवेळी या कामात रस्त्याची नाही तर केवळ या लेनची दुरुस्ती केली जाणार असल्याचेही अधिकारी सांगत आहे. त्यामुळे जर रस्त्याची दुरुस्ती आहे, तर बीआरटीचे नाव कशाला? आणि जर या कामासाठी 44 लाखांचा खर्च अपेक्षित आहे, असे पूर्वगणकपत्र असेल तर प्रत्यक्षात हे काम 37 टक्के कमी दराने कसे होणार, याबाबत मात्र अधिकाऱ्यांकडे काहीच उत्तर नाही.