वाघोली(प्रतिनिधी) :- पुणे महापालिका हद्दीत एक जुलैपासून समाविष्ट झालेल्या वाघोलीसह 23 गावांची थकीत स्ट्रीट लाईट, कार्यालये, शाळा आदींची लाईट बिले पुणे महानगरपालिका भरणार आहे. थकीत बिले भरण्यासाठी सन2020-21 पथवरील दिवाबत्ती खर्चातील तरतूद वापरण्यात येणार आहे.
महावितरणकडे नव्याने पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांची एकूण साडे चार कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये 1 कोटी 87 लाख रुपयांची सर्वाधिक थकबाकी एकट्या वाघोली गावाची आहे. अनेक वर्षांपासूनची थकबाकी असल्याने महावितरणने कठोर भूमिका घेऊन स्ट्रीट लाईटचे कनेक्शन तोडले आहे.
“वाघोली मधील थकीत वीज बिलामुळे पथदिवे बंद होते या बाबत महिलांची सुरक्षितता ऐरणीवर आली होती. पुणे महानगरपालिकेने याबाबत योग्य निर्णय घेतला असून सर्व महिला वर्गातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. दैनिक प्रभात ने देखील या प्रश्नाला वाचा फोडण्यास मदत केल्याबद्दल त्यांचे देखील आभार.
– जयश्री राजेंद्र सातव पाटील (माजी सरपंच, ग्रामपंचायत वाघोली )
वाघोलीतील बहुतांश रस्ते अंधकारमय झाले आहेत. वाघोली चे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी पाठपुरावा केला होता . याबाबत दैनिक प्रभात ने बातमी प्रसिद्ध करून या प्रश्नाला वाचा फोडली होती.
“वाघोली मधील पथदिव्यां च्या वीज बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला यश आले असून नागरिकांच्या मागणीचा विचार पुणे महानगरपालिका करत असल्याचे एक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. या पुढील काळात देखील वाघोलीतील विविध प्रश्नांच्या कामी पुणे महानगरपालिका व राज्य शासन यांनी हीच भूमिका ठेवावी हीच माफक अपेक्षा.
– राजेंद्र सातव पाटील (माजी उपसरपंच, ग्रामपंचायत वाघोली)
समाविष्ट गावांचे रस्ते अंधकारमय होऊ नये याची काळजी महापालिकेने घेऊन याकरिता साडे चार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. स्थायी समितीच्या बैठकीस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.