…तर पाणीटंचाईला महापालिकाच जबाबदार

पाटबंधारे खात्याचा पाणीवापराबाबत इशारा

पुणे – महापालिकेने पाण्याचा वापर कमी केला नाही; तर जून आणि जुलै महिन्यामध्ये निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईला पूर्णपणे महापालिका जबाबदार असेल असा निर्वाणीचा इशारा पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला देण्यात आला आहे.

महापालिकेने दररोज 892 एमएलडी पाणी उचलावे, अशा सूचनाही पाटबंधारे विभागाकडून करण्यात आल्या आहेत. मात्र 892 एमएलडी तर सोडाच परंतु उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढत असल्यामुळे महापलिकेला 1,350 एमएलडी पाणी देखील पुरत नसल्याचे उत्तर महापालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाला दिले आहे.

पुणे शहराची एकंदर लोकसंख्येचा विचार केला असता, शहराला दररोज 1,350 एमएलडी पाण्याची आवश्‍यकता आहे. उन्हाळ्यामध्ये पुणे शहराची गरज 20 टक्‍क्‍यांनी वाढते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये प्रती माणसी पाण्याचा वापर 135 लिटर इतका असतो मात्र उन्हाळ्यामध्ये 155 लिटरपर्यंत वाढतो. त्यादृष्टीने नियोजन करणे आवश्‍यक आहे. सध्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्‍यकता असल्याचे वारंवार सांगितले जात आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने 17 डिसेंबर 2018 च्या आदेशानुसार महापालिकेने वर्षाला 11.50 टीएमसी पाणी वापरावे असे आदेश दिले होते. महापालिकेचा पाणीवापर महाराष्ट्र जलसंपती प्राधिकरणाच्या आदेशानंतरही मार्च 2019 अखेरपर्यंत 1,350 एमएलडी प्रमाणे राहिला आहे. यानंतर महापालिका एप्रिल महिन्यामध्ये 1,400 एमएलडी पाणी उचलत आहेत. दैनंदिन पाण्याचा वापर महापालिकेकडून वाढत आहे हे अत्यंत गंभीर असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे असून, त्यांनी याविषयी महापालिका प्रशासनाला वेळोवेळी लेखी कळवले आहे.

खडकवासला प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सध्या सुरू आहे. महापालिकेच्या जास्त पाणी वापरामुळे जुन आणि जुलै महिन्यामध्ये शहराला पिण्यासाठी पुरेसे पाणी शिल्लक राहणार नाही. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेने तत्काळ पाण्यात कपात करावी, असा सूचना वजा आदेशच पाटबंधारे विभागाने दिला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त यांनी पाण्याच्या नियोजनासंदर्भातच येत्या गुुरूवारी बैठक बोलावली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.