#लोकसभा2019 : बसपाचा उमेदवार कॉंग्रेसमध्ये सामील

मध्य प्रदेशातील पाठिंबा काढून घेण्याचा मायावतींचा इशारा

नवी दिल्ली – गुणा लोकसभा मतदारसंघातील बसपाचा उमेदवार कॉंग्रेसने पळवला असून त्याला आपल्या पक्षात वाजतगाजत सामील करून घेतले आहे. या मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हा डावपेच खेळला आहे. त्यांच्या या खेळीमुळे बसपा अध्यक्षा मायावती संतापल्या असून एका ट्‌विटद्वारे त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. कॉंग्रेसला याचे परिणाम भागावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

गुणा लोकसभा मतदारसंघातून बसपने लोकिंदेरसिंह धाकड यांना उमेदवारी जाहीर केली होती. आता धाकड यांचा कॉंग्रेस प्रवेश करत सिंधिया यांनी मायावती यांना हादरा दिला आहे. धाकड यांच्यामुळे कॉंग्रेस आणखी मजबूत होईल असा विश्वास सिंधिया यांनी बोलून दाखवला.

या मतदारसंघातून सिंधिया 4 वेळा निवडून आलेले आहेत. पुन्हा विजयी होण्यासाठी त्यांनी आपला पूर्ण जोर लावला असून हरतऱ्हेने ते ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्य प्रदेशात बसपचे 2 आमदार निवडून आलेले आहेत. या आमदारांनी कमलनाथ यांच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे. धाकड यांना कॉंग्रेसने आपल्याकडे वळवल्याने भडकलेल्या मायावती यांवी मध्य प्रदेशात कॉंग्रेसला दिलेले समर्थन काढून घेण्याचा इशारा दिला आहे. लवकरच याच मतदारसंघात मायावती यांची जाहीर सभा होणार आहे. ज्या उमेदवारासाठी सभा होणार होती तोच कॉंग्रेसमध्ये गेल्याने मायावती आणि त्यांच्या पक्षाची अडचण झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.