पुणे – कोरोनाव्हायरस संकटकाळादरम्यान देशभरात अनलॉक -5 सुरू असताना 15 ऑक्टोबरपासून सिनेमा थिएटर पुन्हा उघडण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासह माहिती व प्रसारण मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचनाही जारी केली आहे. या बातमीमुळे चित्रपटउद्योगासह सिनेरसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्राबाहेरील कामांना सूट दिली असून यामध्ये 15 ऑक्टोबरपासून थिएटर आणि मोठे मल्टीप्लेक्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, चार ते पाच महिन्यापासून कोणताही चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झालेला नाही. लॉकडाऊन मध्ये बहुतांश चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. अशावेळी चाहत्यांना असा प्रश्न पडला आहे की, आता थिएटर्स सुरू झाल्यानंतर सर्वात आधी कोणता सिनेमा प्रदर्शित होईल?
मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑक्टोबरनंतर थिएटर आणि मल्टीप्लेक्स उघडल्यानंतर सर्वप्रथम ‘खाली पिली’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन नंतर प्रदर्शित होणारा खाली पिली हा पहिला सिनेमा असणार आहे. या चित्रपटात अभिनेता इशान खट्टर आणि अभिनेत्री अनन्या पांडे ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सिनेमागृहचालकांसाठी हे असतील नियम :
– सिनेमा हॉलमध्ये केवळ 50 टक्के लोकांना बसण्याची परवानगी.
– फेस मास्कशिवाय एन्ट्री होणार नाही, सिनेमा दरम्यान फेस मास्क घालणे अनिवार्य.
– सामाजिक अंतराचे पालन करावे लागेल.
– एक जागा वगळता बसण्याची व्यवस्था केली जाईल.
– हात धुणे आणि स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
– प्रत्येकाला आरोग्य सेतु अॅप वापरण्याचा सल्ला दिला जाईल.
– सिनेमा हॉलमधील दोन शोमध्ये इतका फरक द्या जेणेकरून संपूर्ण हॉल स्वच्छ होईल.
– सिनेमागृहात व्हेंटिलेशन आणि एसी तापमानाचीही काळजी घेतली पाहिजे.
– थिएटरमध्ये एसी तापमान 24 ते 30 डिग्री सेल्सियस दरम्यान असले पाहिजे.
– सर्व सिनेम हॉलमध्ये थर्मल स्क्रीनिंग केली जाईल.
– ज्यांना लक्षणे नसतात, त्यांनाच आत प्रवेश करण्याची परवानगी असेल.
– तिकिटांसाठी पुरेसे काउंटर तयार केले जावेत.
– गर्दी टाळण्यासाठी अॅडव्हान्स बुकिंग आवश्यक.
– थिएटरमध्ये फक्त पॅक केलेल्या अन्नास परवानगी असेल
– हॉलमध्ये खाद्यपदार्थ दिले जाणार नाहीत.