पिंपरी – शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या स्वतःच्या आईला जबरदस्तीने घरात डांबून ठेऊन तिला शिवीगाळ करीत मारहाणही करण्यात आली. याप्रकरणी तिच्या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका बहिणीने आपल्या सख्ख्या बहिणीच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च 2020 ते 10 ऑगस्ट 2020 दरम्यान घडला आहे.
सुलभा हेमंत बिऱ्हाडे (वय 57, रा. आयआयटी स्टाफ क्वार्टर्स, पवई मुंबई) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 10) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनीषा सचिन शहा (रा. विजयश्री सोसायटी, शाहूनगर, चिंचवड) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या आई सुशीला सावंत या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. सुशीला यांचे पती आणि कालांतराने मुलाचा मृत्यू झाल्याने त्या एकट्या राहू लागल्या होत्या. फिर्यादी यांची बहीण आणि आरोपी मनीषा हिने मार्च 2020 मध्ये आईला शाहूनगर, चिंचवड येथे राहायला नेले. त्यानंतर मनीषाने आई सुशीला यांना रोज शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच त्यांना उपाशी ठेवले. आईला फोनवर देखील बोलू दिले नाही. हा प्रकार आई सुशीला यांनी त्यांची तिसरी मुलगी सुमय्या यांना फोन करून सांगितला. हा प्रकार कळाल्यानंतर फिर्यादी सुलभा आणि त्यांचा मुलगा मनीषा हिच्या घरी आले आणि आईला आपल्यासोबत घेऊन जात असल्याचे सांगितले. मनीषाने आईला घेऊन जायचे नाही, असे म्हणून सुलभा यांच्याशी भांडण केले. तसेच त्यांना बाहेर काढले. सुलभा यांनी बहिणीविरोधात आईचा छळ केल्याची फिर्याद दिली आहे.