मुंबई – सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीची आज अंमलबजावणी संचालनालय अर्थात ‘ईडी’कडून कसून चौकशी करण्यात आली. आठ तास चाललेल्या या चौकशीनंतर ईडीने रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि भाऊ शोविक यांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत.
दरम्यान, मराठी वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार रियावर मनी लॉड्रिंग म्हणजे आर्थिक अनियमितता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे तिचे देखील दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तसेच शोविक यांनी सहकार्य न केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी रिया आणि शोविक या दोघांचे आयपॅड, मोबाइल आणि इंद्रजीत यांचा लॅपटॉप जप्त केला आहे.
तत्पूर्वी, रिया चक्रवर्तीने एका संदेशाद्वारे तिच्याकडे असलेल्या सुशांतच्या संपत्तीबाबत खुलासा केला आहे. याबाबत रियाने माध्यमांना एक संदेश पाठवला असून यामध्ये तिने, “माझ्याकडे असलेली सुशांतची एकमेव मालमत्ता.” असं लिहीत या मालमत्तेचे फोटो शेअर केले आहेत. रियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, सुशांतने तिच्यासाठी लिहिलेल्या एका संदेशाचा व एका पाणी बॉटलचा समावेश आहे. तिने शेअर केलेल्या या पाणी बॉटलवर ‘छिछोरे’ (सुशांतच्या गाजलेला चित्रपट) असं लिहलं आहे.