कोलकाता – प. बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील कौननगर भागात चौथीत शिकणाऱ्या एका दहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह त्याच्या घरात आढळून आला होता. या मुलाची अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. आगोदर त्याच्या चेहऱ्यावर ओळखही पटणार नाही असे वार करण्यात आले होते व नंतर त्याच्या हाताच्या नसाही कापण्यात आल्या होत्या.
श्रेयांशू शर्मा असे त्या चिमुरड्याचे नाव असून त्याची बहिण घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आहे. ज्या क्रूरपणे त्याचा खून करण्यात आला होता ते पाहुन पोलीस चक्रावले होते. मात्र त्याच्या आईनेच त्याची हत्या केली असल्याचे सत्य उघडकीस आल्यावर खळबळ निर्माण झाली आहे.
श्रेयांशूचे वडील खासगी नोकरीत आहेत तर आईही एका ठिकाणी कामाला जाते. श्रेयांशूची हत्या झाली तेंव्हा ते दोघेही घरी नव्हते. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांना मृतदेह आणि मोठ्या आवाजाच टीव्ही सुरू असल्याचे आढळून आले. एवढ्या लहान मुलाचे कोणाशी एवढे वैर असेल की त्याची इतक्या निर्दयीपणे हत्या करण्यात आली हे पोलिसांना पडलेले कोडे होते. अखेर त्यांनी सीसीटीव्हीची मदत घेतली. त्यात हत्या झाली त्या सुमारास श्रेयांशूची आई व तिची मैत्रीण बाहेर जाताना दिसून आले.
पोलिसांनी आईला ताब्यात घेत तिची कठोर चौकशी केल्यावर तिने गुन्ह्याची कबुली दिली. मुलाने आपल्याला आपल्या मैत्रिणीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. त्यावरून तो नाराज राहत होता म्हणून हत्या केल्याची कबुली तिने दिली. हत्या कशी केली याचा तपशीलही तिने दिले. मैत्रीणीच्या मदतीने अगोदर मुलाच्या चेहऱ्यावर एका मूर्तीने जोरात वार करण्यात आला. त्यात तो बेशुध्द होऊन खाली पडल्यावर त्याच्या दोन्ही हातांच्या नसा कापण्यात आल्या. त्यानंतरही तो जिवंत राहु नये याची दक्षता घेत त्याच्या शरिरावर असंख्य वार करण्यात आले.
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचे तिच्या मैत्रीणीशी समलैंगिक संबंध असल्याची कल्पना तिच्या पतीलाही होती. मात्र ते समाजाच्या भीतीने गप्प होते. दहा वर्षांच्या मुलाच्या मनावर मात्र याचा परिणाम झाला होता. तो चिडचिड करायचा आणि गप्पही राहत होता. तो आपल्या संबंधांत अडथळा झाला असल्याचे मानून महिलेने आपल्याच मुलाची निर्दयीपणे हत्या केली.