पुणे / लोणी काळभोर -पोलीस असल्याची बतावणी करीत नागरिकांची फसवणूक करून त्यांच्याकडील दागिने, रोकड चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या म्होरक्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने जेरबंद केले. त्याच्याविरोधात महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यांत 30 गुन्हे दाखल आहेत. जाफर हुसेन इराणी (सध्या रा. कोंढवा, मूळ रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे), असे अटकेतील म्होरक्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासून साक्षीदार यांच्याकडे तपास केला. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आंतरराज्य टोळीचा म्होरक्या इराणीला कोंढवा परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदार सादीक इराणी (रा. कोंढवा, मूळ रा. गुंडलिक, कर्नाटक) याच्या मदतीने राजगड हद्दीत दोन गुन्हे केल्याचे कबूल केले.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, प्रदीप चौधरी, हवालदार राजू मोमीन, अतुल डेरे, मंगेश थिगळे, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, धीरज जाधव, मंगेश भगत यांनी केली आहे. पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.