पिंपरी – उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांनी अग्निशमन विभागातील आठ जवानांचा सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी (दि. 15) हा सन्मान करण्यात आला.
सेवानिवृत्त लीडिंग फायरमन तानाजी चिंचवडे अशोक इंगवले या दोघांनाही “सुरक्षित सेवापूर्ती पदक’ देण्यात आले. चिंचवडे आणि इंगवले यांनी 1988 पासून तब्बल 35 वर्ष अग्निशामक विभागात केलेल्या सुरक्षित सेवापूर्ती पदक देण्यात आले. लीडिंग फायरमन सुभाष लांडे यांनाही 33 वर्षाच्या सेवेसाठी सन्मानित करण्यात आले.
सिनियर फायरमन सोमनाथ तुकदेव यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ देण्यात आले. 20 मे 2023 रोजी दुर्गादेवी टेकडीवरील आग वर्दी पूर्ण करून प्राधिकरण उप केंद्रात परत येत असताना अग्निशमन वाहनाच्या इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने अग्निशमन वाहनाच्या केबिन मध्ये आग लागली. या विपरीत परिस्थितीत तुकदेव यांनी समयसूचकता दाखवून वाहनातील बॅटरी विद्युत पुरवठा खंडीत करून अग्निरोधक यंत्राचा वापर करून आग विझविली. याच वर्दीवर असलेले वाहन चालक लक्ष्मण बंडगर यांनी अग्निशमन वाहनाला आग लागताच परिसरातून बकेटच्या सहाय्याने पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे मोठे नुकसान टळले. याबद्दल लक्ष्मण बंडगर यांचा “अग्रिशमन सेवा पदक’ देऊन सन्मान करण्यात आला.
2 ऑगस्ट रोजी पूरस्थितीत असलेल्या नदी पात्रात मधोमध अडकलेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी वाहन चालक प्रदीप भिलारे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. नदीपात्रात उडी घेऊन अडकलेल्या व्यक्तीची सुटका केली. याबद्दल त्यांना “अग्निशमन सेवा विशेष बचाव पदक’ देऊन सन्मानित केले.
लीडिंग फायरमन विठ्ठल सपकाळ यांनी 21 जून 2023 रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात गोतंडी गावात पालखी मुक्कामाच्या ठिकाणी लागलेल्या आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले. उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले यांनी 21 जुलै 2023 रोजी प्राधिकरण येथे दलदलीत अडकलेल्या 65 वर्षीय व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. या दोघांनाही सन्मानित करण्यात आले.