लंडन : पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राची निर्मिती कशा प्रकारे झाली याबाबत नेहमीच शास्त्रज्ञांना उत्सुकता असते. आत्तापर्यंतच्या संशोधनाप्रमाणे चंद्राच्या निर्मितीला हजारो वर्षे लागली असे समजण्यात येत होते पण एका नव्या संशोधनाप्रमाणे चंद्राची निर्मिती काही तासातच झाली आहे. हा नवा सिद्धांत मांडून शास्त्रज्ञांनी चंद्राच्या निर्मितीला हजारो वर्षे लागल्याचा आपला जुना सिद्धांत बाद ठरवला आहे.
सुमारे 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीला एक महाकाय ग्रह धडकल्याने टकरीनंतर काही अवशेष अंतराळात राहिले होते त्यापासूनच चंद्राची निर्मिती झाली आहे. या टकरीनंतर चंद्राच्या निर्मितीचा काळ हजारो वर्षांचा असल्याचे आतापर्यंत मानण्यात येत होते पण आता इंग्लंड मधील डरहॅम युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केलेल्या संशोधनाप्रमाणे या टकरीनंतर काही तासातच चंद्राची निर्मिती झाली आहे.
नासाने नुकताच एक ॲनिमेशन व्हिडीओ प्रदर्शित करून साडेचारशे कोटी वर्षांपूर्वी झालेली ही टक्कर आणि त्यानंतर झालेली चंद्राची निर्मिती ही प्रक्रिया समजावून सांगितली आहे. शास्त्रज्ञांनी कॉस्मा नावाच्या एका सुपर कॉम्प्युटरचा वापर करून हा नवीन सिद्धांत मांडला आहे.
पृथ्वीपासून चंद्र साधारण तीन लाख 80 हजार किलोमीटर दूर आहे. आतापर्यंत चंद्रावरील ज्या अवकाश मोहिमा राबविण्यात आला तेव्हा चंद्रावरील काही मातीचे नमुने गोळा करण्यात आले होते. या नमुन्यांचा अभ्यास करता चंद्राचे वय 450 कोटी वर्ष आहे असे मानले जाते.