पुणे, दि. 10 -पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंक प्रकल्पात जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास 500 ते 600 फूट अंतरावर हा बोगदा आहे. बोगद्याची लांबी 8 कि.मी. असून जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याची रुंदी 23.75 मीटर असून, जगातील सर्वाधिक रुंदीचा हा बोगदा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. डिसेंबर 2023 हा प्रकल्प पूर्णत्वास येईल. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. बोगद्यामुळे घाटाचा भाग पूर्णतः टाळला जाऊन अपघातांत घट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील नवीन मार्गिकेच्या (मिसिंग लिंक) प्रकल्पाला भेट देऊन लोणावळा येथे सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) महासंचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, “एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवास सुखकर होणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल. त्याशिवाय प्रदूषण कमी होणार असून, इंधनाची तसेच वेळेची बचत होईल. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रवासी, वाहने यांच्या सुरक्षेचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. दरडी कोसळू नये, यासाठी सर्वत्र रॉक बोल्ट करण्यात आले आहे. काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाहेर जाण्यासाठी प्रत्येक 300 मीटरवर एक्झीट मार्ग तयार करण्यात आले आहेत.
बोगद्याच्या भिंतीला पाच मिटरचे कोटिंग असणार असून, त्यावर आगप्रतिबंधक कोटिंग करण्यात येणार आहे. अत्याधुनिक हाय प्रेशर वॉटर मिक्स यंत्रणा असून, त्यामुळे आग लागल्यास ही यंत्रणा त्वरित कार्यान्वित होऊन आग विझेल.
प्रकल्पाची सद्यस्थिती
खालापूर टोलनाका ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील द्रुतगती मार्गाचे 8 पदरीकरणाचे 5.86 कि.मी. चे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. यात तीन मोठे पूल, लहान पूल आदींचे काम 90 टक्के पूर्ण.
व्हाया डक्ट क्र. 1 मध्ये 900 मीटर लांबीचे दोन पूल असून, डाव्या बाजूचे डेस्क स्लॅबचे व उजव्या बाजूच्या खांबांचे बांधकाम सुरू आहे. व्हाया डक्टची डावी बाजू डिसेंबर 2022 तसेच उजवी बाजू मार्च 2023 मध्ये पूर्ण होणार.
बोगदा क्र. 1 च्या दोन समांतर बोगद्यांपैकी उजव्या बोगद्याचे एकूण 1 हजार 560 मीटरपैकी 1 हजार 451 मीटर (मुंबईकडे) खोदकाम पूर्ण झाले असून, डाव्या बोगद्याचे एकूण 1 हजार 530 मीटरपैकी 1 हजार 455 मीटर (पुण्याकडे) खोदकाम पूर्ण झाले आहे.
बोगदा क्र. 2 च्या दोन समांतर बोगद्यांपैकी उजव्या बोगद्याचे एकूण 8 हजार 776 मीटरपैकी 7 हजार 696 मीटर (मुंबईकडे) खोदकाम पूर्ण झाले असून, डाव्या बोगद्याचे एकूण 8 हजार 822 मीटरपैकी 7 हजार 529 मीटर (पुण्याकडे) खोदकाम पूर्ण झाले आहे.