पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कॅन्सर व दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींना पाच हजार रुपयांची मदत केली जाते. ही मदत महापौर निधीतून केली जाते. महापौर निधीची रक्कम वाढवून अशा रुग्णांना किमान एक लाख रुपयांची मदत केली जावी. अशी मागणी महासभेत नगरसेवकांनी केली.
माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, पुणे महापालिकेच्या वतीने कॅन्सर, हृदयरोग, मेंदुचे आजार, गंभीर अपघात व दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना एक लाखाची मदत केली जाते. आपण फक्त पाच हजार रुपये अशा रुग्णांना देतो. त्यांचा रुग्णालयाचा खर्च हा दोन लाखाच्या पुढे असतो. पाच हजार रुपयांचा चेक घेण्यासाठी त्यांना महापालिकेत कितीतरी चकरा माराव्या लागतात. त्यापेक्षा ते पाच हजार रुपये नको अशी नागरिकांची भूमिका असते. पुणे महापालिका एक लाख रुपये देत तर आपण का देऊ शकत नाही.
वैशाली घोडेकर म्हणाल्या, पुणे महापालिकेने या योजनेला शहरी ग्रामीण असे नाव दिले आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलून आपण आपल्याकडेही ती योजना राबवू शकतो. त्यामुळे शहरातील गरीब व गरजू रुग्णांना आधार मिळेल. आपल्या प्रत्येक रुग्णाला एक लाख रुपये द्यायचे असेल तर महापौर निधीमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. 25 लाख रुपये निधीमध्ये आपण प्रत्येक रुग्णाला एक लाख रुपये नाही देऊ शकत. त्यासाठी महापौर निधी किमान आठ ते दहा कोटी करणे आवश्यक आहे.
नगरसेवक सागर आंघोळकर म्हणाले, शहरी ग्रामीण योजना शहरामध्ये राबविणे आवश्यक आहे. यासाठी मी अनेक दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्याशी चर्चा करत आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना फायदा होईल. त्यामुळे महापौर निधीत वाढ केली जावी.