कॉंग्रेसने गुजरातमधील आमदारांना हलवले रिसॉर्टस्‌मध्ये

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर फोडाफोडी टाळण्यासाठी दक्षता

अहमदाबाद -गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 3 आमदारांनी राजीनामे दिल्याने कॉंग्रेस पक्ष सतर्क झाला आहे. त्यातून त्या पक्षाने शनिवारी आपल्या आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी रिसॉर्टस्‌ आणि खासगी बंगल्यांमध्ये हलवले.

गुजरातमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 4 जागांसाठी 19 जूनला निवडणूक होणार आहे. सत्तारूढ भाजपने 3 तर कॉंग्रेसने 2 उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणूक रंगतदार बनली आहे. आमदारांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसचे संख्याबळ 65 पर्यंत खाली आले आहे. तर भाजपचे 103 आमदार आहेत.

निवडणूक जवळ आल्याने गुजरातमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. कॉंग्रेसने दक्षता म्हणून आपल्या आमदारांना एकत्रित ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यातून त्यांना रिसॉर्टस्‌ आणि खासगी बंगल्यांमध्ये हलवण्यात आले. आता आमदारांना थेट निवडणुकीवेळीच विधानसभेत उपस्थित केले जाईल, असे समजते.

दरम्यान, कॉंग्रेसकडून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. विरोधी बाकांवरील आमदारांना जाळ्यात ओढण्यासाठी भाजप ब्लॅकमेलिंग, धाकदपटशा आणि पैशांचा वापर करत आहे. भाजपने कोट्यवधी रूपयांत आमचे 3 आमदार विकत घेतले, असा आरोप कॉंग्रेसने केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.