पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध प्रशासकीय विभागांमध्ये केवळ 40 टक्के कर्मचारीच कार्यरत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ काम करावे लागते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या अतिकालिक भत्त्यात प्रति तास 15 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे यांनी आज काढले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अतिकालिक भत्त्यात वाढ करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली होती. विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने दिलेल्या अहवालानुसार या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.
विद्यापीठ कार्यालयात काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांना 80 रुपये किंवा 90 रुपये प्रति तास अतिकालिक भत्ता दिला जातो. परंतु, या भत्त्यात वाढ झाल्यामुळे आता कर्मचाऱ्यांना 95 रुपये, तर काहींना 105 रुपये प्रतितास अतिकालिक भत्ता मिळणार आहे.